nashik.nic.inकुंभमेळा परिचय


नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे गत कुंभमेळा सन 2003-04 मध्ये संपन्न झाला. आध्यात्मिकतेपोटी मोठया संख्येने भाविक व साधू एकत्रित येण्याचा कुंभ सोहळा भारतात नाशिक- त्र्यंबकेश्वर, प्रयाग (अलाहाबाद), हरिदवार, उज्जैन या ठिकाणी पवित्र नदयाच्या तीरावर दर बारा वर्षांनी संपन्न होतो. प्रयाग व हरिदवार येथे दर सहा वर्षांनी अर्धकुंभ भरण्याची देखील परंपरा आहे. नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा हा गोदावरी नदीकाठी भरतो. प्रयाग येथे गंगा, यमुना व अदृष्य स्वरुपात असलेल्या सरस्वती या नदयांच्या संगमावर, हरिदवार येथे गंगा तीरी तर उज्जैन येथे क्षिप्रा तीरावर कुंभमेळा संपन्न् होतो. कोणतेही आमंत्रण, बोलावणे, सक्ती व साद नसतांना भाविकांच्या लाखोंच्या संख्येने सहभाग हे कुंभमेळयाचे वैशिष्टय आहे.


नाशिक – त्र्यंबकेश्वर कुंभ

प्रयाग, हरिदवार आणि उज्जैन येथे एकत्र स्नान करणारे वैष्णव व शैव आखाडे नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे वेगवेगळया ठिकाणी स्नान करतात हे या कुंभमेळयाचे वेगळेपण आहे. दोन्ही पंथाच्या साधूंमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन पेशव्यांनी केलेल्या व्यवस्थेनुसार वैष्णव आखाडे नाशिक येथे तर शैव / संन्यासी, उदासिन, निर्मल आखाडे त्र्यंबकेश्वर येथे स्नान करतात. वनवासा दरम्यान प्रभुरामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या दंडकारण्याचा नाशिक भाग असल्याची मान्यता आहे. त्रयंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पवित्र गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी टेकडयांवर होतो. श्रीसंत निवृत्तीनाथ यांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर येथे आहे.कुंभमेळा- अर्थ

संस्कृतमध्ये ‘कुंभ’ शब्दाचा अर्थ घडा / घट असा होतो व बऱ्याचदा ‘कलश’ म्हणुन देखील या शब्दाचा वापर होतो. भारतीय ज्योतिष शास्त्रात ‘कुंभ’ नावाची राशी देखील आहे. मेळयाचा अर्थ ‘एकत्रित येणे’ अथवा ‘यात्रा’ असा होतो. ‘कुंभ’ / घट याचा शब्दश: अर्थ घडा / घट असा असा होत असला तरी मुलभुत अर्थ वेगळाच आहे. इतकेच नव्हे तर घट, ‘कुंभ’, ‘कलश’ हिंदु संस्कृतीतील पवित्र कार्यातील एक अविभाज्य घटक आहेत. हाच घट कुंभाचे प्रतिक मानला जातो. कलशस्य मुखेविष्णु : कण्ठे रुद्र समाश्रित: मूलेतय स्थितो ब्रम्हा मध्ये मातृगणा : स्मृत: || कुक्षौ तु सागरा : सर्वे सप्त दीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुवेदो सामवेदोअथर्वण : || अंगैश्च सहित: सर्वे कलशं तु समाश्रिता: | हिंदू संस्कृतीत घटास विशेष महत्व असून घटाचे मुखात श्री विष्णु, मानेत रुद्र, तळाशी ब्रम्हा, मध्यभागी सर्व देवता व अंतर्भागात सर्व सागर म्हणजेच चार वेद सामावले आहेत असे मानले जाते. संस्कृतमध्ये ‘कुंभ’ शब्दाचा अर्थ मानवी शरीर असा देखील होतो. शरीर रुपी घटात जीवनामृत, आत्मा, पाणी हे सामावलेले आहेत. सागर, नदी, तळे, घट यात पाणी सर्व बाजुंनी कुंभासारखेच बंदिस्त असते. ज्या प्रमाणे आकाशास वारा सर्व पृथ्वीला सुर्य किरणे व्यापून टाकतात त्याच प्रमाणे मानवी शरीर देखील पेशी व ऊतींनी व्यापलेले आहे. मानवी शरीर देखील पाणी, जमीन, आग, आकाश आणि वारा हया पाच तत्वांनी निर्मित आहे. लाखोंच्या संख्येने कुंभमेळयातील स्नान सोहळयात भाविक याच मानवी घटातील शाश्वत सत्याचा शोध घेण्यासाठी सहभागी होतात. ज्ञान व आध्यात्मिकतेचे प्रतिक समजला जाणारा ‘घट’ / ‘घडा’ कुंभाबरोबरच स्वत्वाचा शोध येण्या बरोबरच ज्ञान व आध्यात्मिकतेचे दर्शन (ज्याचे प्रतिक घट / कुंभ समजला जातो) घेण्यासाठी भाविक कुंभमेळयात स्नान करतात.कुंभमेळयाचा मौलिक / मुलभुत अर्थ

कुंभमेळा आध्यात्मिक, ज्ञान व आपल्या संस्कृतीचा संगम आहे. यात साधू, संत, भौतिक सुखांचा त्याग केलेले महात्मे प्रेम, एकात्मिकता, बंधुभाव, आध्यात्मिकता याचा प्रसार करण्यासाठी एकत्र येतात. हे सर्व गुण कधीही रिक्त न होणाऱ्या मानवी जीवनरुपी घटातून भाविकांपर्यंत पोहचतात. कुंभमेळयादवारे आपणास पृथ्वी, आपला निसर्ग, पवित्र नदया यांचे माहात्म्य समजते. कुंभमेळा हा निसर्ग व मानवी जीवनाचा संगम देखील आहे. कुंभमेळयामुळे आपला या महत्वाच्या गुणांवरील विश्वास पुनर्जिवित होऊन आपले मन व शरीरास सदगुणांची शाश्वत शक्ती प्राप्त होते.

 

सुरवातीच्या काळात कुंभमेळयाचे स्वरुप लहान होते. कालानुरुप कुंभमेळा संपन्न होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पुर्वीच्या कुंभमेळयापेक्षा सहभागी होणाऱ्या साधू व भाविकांची संख्या पुढील कुंभमेळयात अनेक पटीने वाढते आहे. रस्ते, दळणवळणाची साधने , इत्यादी मुलभुत सुविधांमध्ये झालेल्या विकासामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील साधू व भाविकांना कुंभमेळयात सहभागी होणे शक्य झाले आहे. कुंभमेळा केवळ लोकांची गर्दी अथवा जत्रा नसुन कुंभमेळा ज्ञान, आध्यात्मिकता, साधुत्व व समर्पणाचा सोहळा आहे. कुंभमेळयासाठी साधूग्राम, वाहनतळे आरोग्य व स्वच्छता व्यवस्था, विदयुत व्यवस्था, पाणी पुरवठा या सारख्या सुविधा लाखो साधु व भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पुरविल्या जातात.

 

कुंभमेळयातील सहभाग पवित्र असतो या विश्वासाने भाविक दुर दुरवरुन कुंभमेळयात सहभागी होतात. साधू व भाविकांची सेवा करण्याच्या हेतूने अन्न्‍ छत्र चालविणे, दान धर्म करणे, आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेत जीवरक्षक स्वयंसेवक म्हणून काम करणे या कार्यात भाविक सहभागी होतात. शासन व प्रशासनास देखील साधू व भाविकांच्या सुविधांशी निगडीत प्रत्येक गोष्टिचे सुक्ष्म नियोजन करावे लागते.

 

Top Of Scroll

 

Top