बंद

इतिहास

ऐतिहासिक कालखंड

नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय) नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यावेळेस ते येथील रहिवासी होते. सातवाहन काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स.१५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे. इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता. इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नाहापान या शत्रपने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.

 • इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नाहापानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला. नाहापानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.
 • इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.
 • इ.स ८०-१२५ हा शत्रप वर्चस्वाचा कालखंड होता.
 • त्याचप्रमाणे इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजेनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती शत्रपांची होती.
 • इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.
 • सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले.
 • नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता.
 • यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली. इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते.
 • इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले
 • सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता.
 • सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले.
 • इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला.
 • इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.

सातवाहन राजवंश

१) सिमुक २) कृष्ण ३) सातकर्णी १ ४) वेदश्री ५) शक्तीश्री ६) पूर्णोत्संग ७) स्कन्द्स्भि (?) ८) २रा सातकर्ण ९) लंबोदर १०) आपीलक ११) मेघस्वाती १२) स्वाती १३) स्कन्द्स्वति १४) मृगेंद्र १५) कुंतल १६) स्वतीवर्ण १७) प्रथम पुलोमावी १८) अरिष्ठ्यकर्ण १९) हाल २०) मंतलक २१) पुरिंद्रसेन २२) सुंदर सातकर्णी २३) चकोर २४) शिवस्वाती २५) गौतमीपुत्र सातकर्णी २६) वासिष्टीपुत्र सातकर्णी २७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी २८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी २९) माथारीपुत्र सक्सेन ३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी ३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती ३२) तृतीय पुलोमावी

यादव काळ

 • तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला.
 • इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले. व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर हि राजधानी होती. सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती.
 • इ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८, च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.
 • अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला.
 • खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत होता.
 • इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.
 • अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.

मुस्लिम कालखंड

 • इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले.
 • इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.
 • इ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले.
 • इ.स.१३६६मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडवून आणले.
 • इ.स.१६०९मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणाखाली आला.
 • इ.स.१६३२पर्यंत मोगलांनी दख्खन, वर्‍हाड, खानदेश या प्रांतांसह नाशिकमध्ये मोगल साम्राज्याचा पाया पक्का केला.
 • इ.स.१६८२पर्यंत मोगलांनी बरेच विजय मिळवले.
 • शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) येथेकेली.
 • इ.स.१६८८मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली.
 • इ.स.१६९६मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला.
 • इ.स.१७०७ पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फिकार खान, ममार खान, मतबर खान आदी अधिकारी नाशिक-खानदेशवर नियुक्त होते.
 • शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मोगलांकडून दख्खनची चौथाई सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता.
 • बागलाण गलना भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.

मराठा कालखंड

 • इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.
 • इ.स.१७४७नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला.
 • सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशंकराची घंटा बांधली.
 • १७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले.
 • सरदार चंद्रचूड यांनी १७५६मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले.
 • काळाराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले.
 • १७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला.
 • व बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले. तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. इ.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली. परंतु मराठ्यांनी त्याला इ.स.१७५२ च्या शांतता करारान्वये परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला.
 • पहिल्या निजामाच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नासिक हे नाव पुन्हा सुरू केले.
 • इ.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले.
 • इ.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले. .
 • इ.स.१७६३ विनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली. यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले.
 • इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.

ब्रिटिश कालखंड

ब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले.१८५७ मध्ये नाशिक महत्त वाचे ठिकाण बनले. ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्याभिल्लांनी भाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते. ह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्व घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटिशाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला . आपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतले. त्याच्या बंदोबस्तासाठी लेफ्टनंट हेनरी, टी.थॅचर, एल.टेलर हे अधिकारी आले. हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नरच्या मामलेदारांनी मागोजीला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकरावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक जिल्ह्यातल्या २४ गावांत छोट्या जहागिरीत शिरले. यावेळी ब्रिटिशधार्जिणे राजे भगवंतराव व त्याच्या माणसांस फासावर लटकावले. भोगोजी नाईक हे आणखी एक बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅखप्टन नटरलरने वर्षभर प्रयत्‍न केले. पण जमले नाही. भोगोजी नाईक हे ब्रिटिशांशी सिन्नर, येवला या भागांत लढले. भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास सटर ह्या इंग्रज सेनानीला यश मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती. इ.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.

 • इ.स.१८६१ मध्ये अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना झाली.
 • इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.
 • इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले.
 • इ.स.१८७७ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.
 • इ.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन
 • इ.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली.

मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झळकावू लागली.

 1. वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला.
 2. टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली.
 3. मित्रमेळात औरंगाबादच्या अनंत कान्हेरेचा समावेश झाला.
 4. २१ डिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घातल्या.
 5. जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली.
 6. २९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे होते..
 7. सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले.
 8. २५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली.
 9. बाबासाहेब अंबेडकरांचे नाशिक मधील योगदान महत्त्वाचे होते.
 10. बाबासाहेब अंबेडकरांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला.

आधुनिक काळातील इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेर्‍यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली – इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे. तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसर्‍या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत. याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा याचा आराखडा ठरवला गेला. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. भारतीय चित्रपटाचा उगम नाशकाशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे. फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशकातच सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.

नाशिक जिल्हा सरासरी समुद्र पातळी 565 मीटर असून , 20.02 उत्तर अक्षांश व 73,50 अंश पूर्व रेखांश महाराष्ट्र राज्यातील वायव्य भागात स्थित आहे. नाशिक जिल्ह्यास महान पौराणिक पार्श्वभूमी आहे. प्रभू रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे राहिले होते . अगस्ति ऋषी देखील तपस्या करण्यासाठी नाशिक येथे राहिले होते. गोदावरी नदी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. त्र्यंबकेश्वर हे देखील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. नाशिक येथे अनेक ख्यातनाम व्यक्ती जसे वीर सावरकर, अनंत कान्हेरे, दादासाहेब पोतनिस, बाबूभाई राठी, वि वा शिरवाडकर ,वसंत कानेटकर हि काही नावे. नशिक हे छोटे महाराष्ट्र असल्या सारखे आहे,कारण सुरगाणा, पेठ, हवामान आणि माती अटी, इगतपुरी कोकण, निफाड, सिन्नर, दिंडोरी सह प्रस्तुत करणारे सर्वात जवळचे कारण नाशिक देखील बागलाण ब्लॉक पश्चिम महाराष्ट्र, येवला आहेत, मिनी महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते, नांदगाव व चांदवड ब्लॉक विदर्भ आहेत. नाशिक, मालेगाव, मनमाड, इगतपुरी नाशिक जिल्हा मोठ्या काही शहरे आहेत.

सहयाद्री पर्वताच्या कुशीतील गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक हे शहर वसलेले आहे. नाशिक हे शहर पुराणकाळापासून प्रसिध्द व पवित्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते.पौराणिक काळातील चौदा वर्षाच्या राम लक्ष्मण यांचे वनवास काळात नाशिक जवळील जंगलात लक्ष्मणाने शूर्पनखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृ त भाषेत नाकाला नासिका म्हणतात, म्हणून या भागाचे / जिल्हयाचे नाव नाशिक असे पडले आहे. नाशिक जिल्हा महाराष्ट्रच्या उत्तरभागी १९.३३ आणि २०.५३ या उत्तर अक्षांश व ७३.१६ आणि ७५.१६ या पूर्व रेखांश या भौगोलिक पटृयात वसलेला आहे. जिल्हयातील सर्व नद्या सहयाद्रीपर्वतात उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. वरील दोन तालुके वगळतात उर्वरित जिल्हयाच्या मध्यातून पूर्व-पश्चिम अशी रेषा गृहीत धरल्यास जिल्हयाचे दोन भाग होतात.या रेषेच्या उत्तरेकडील भागातील पावसाचे पाणी गिरणा व तिच्या उपनद्यांद्वारे सरते शेवटी तापी नदीत वाहून जाते. तर रेषेच्या दक्षिणेकडील भूभाग गोदावरीचे खो-यात वसलेला आहे. जिल्हयातील नद्यांचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे जिल्हयातील सर्व नद्या जिल्हयातच उगम पावतात. एकही जल प्रवाह जिल्हा बाहेरून नाशिक जिल्हयात येत नाही. पेठ आणि सुरगाणा या तालुक्यातील जलप्रवाहाव्यतीरीक्त इतर सर्व जलप्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. जिल्हयाच्या पश्चिम सिमेवर सहयाद्री पर्वतमाला आहे. तसेच जिल्हयात अनेक डोंगर आहेत. जिल्हयातील बहुतेक सर्व डोंगर पश्चिमेकडील सहयाद्री पर्वताचे पूर्वेकडे पसरलेले फाटे आहेत.

महाराष्ट्रतील सर्व विविधता नाशिक जिल्हयात दिसून येतात. सुरगाणा आणि पेठ या तालुक्यातील पावसाचे प्रमाण, हवामान, पिके हे कोकणातील सर्व बाबींशी समरूप आहेत.या तालुक्यातील वनात उत्कृष्ट प्रतिचा साग व इतर वनउपज मोठया प्रमाणात मिळतात. याच डोंगराळ भागात मोठया प्रमाणात आदीवासी राहतात. जिल्हयाच्या मध्य व पूर्व भागात पश्चिम महाराष्ट्रसारखी भाजीपाला, फळे आणि मोठया प्रमाणात उस पिकतो. या भागात साखर कारखाने आहेत. या भागात ओलीता खालील क्षेत्र मुबलक असल्यामुळे दुधाकरीता आवश्यक असलेल्या हिरव्या चा-याची पिके मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे दुधाचे उत्पादन भरपूर होते. जिल्हयात उत्पादन होणारा भाजीपाला मोठया प्रमाणात मुंबईला पुरविला जातो म्हणून नाशिक जिल्हयास मुंबईची परसबाग व गवळीवाडा असेही म्हणतात. पुणे, मुंबई प्रमाणेच नाशिक जिल्हयाचे झपाटयाने औद्योगिकरण होत आहे. जिल्हयाच्या पूर्व भागात हवामान उष्ण असल्यामुळे येथे विदर्भ-मराठवाडा प्रमाणे कापूस व ज्वारीचे उत्पादन सुध्दा होते.

नाशिक जिल्हयाचे क्षेत्रफळ १५.५३० चौ.की.मी.आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ५.०४ क्षेत्र व्यापलेल्या या जिल्हयाचा, राज्याचा एकू ण क्षेत्रफळाचा विचार करता पाचवा क्रमांक आहे. २००१ च्या जनगनणेनुसार राज्याच्या ५.१५ प्रतिशत असलेल्या ४९.८७ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्हयाचा लोकसंख्ये बाबत राज्यात चौथा क्रमांक आहे. राज्याचा दर चौरस किमी ला ३१४ लोकसंख्या घनतेच्या तुलनेत जिल्हयाच्या दर चौ.कि.मी. ला लोकसंख्या घनता ३२१ इतकी आहे. जिल्हयातील एकूण १,९३१ खेडी १५ तालुक्यातील सामुहिक विकास गटात सामावलेली आहे. जिल्हयात दोन महानगर पालिका, एक कटक मंडळ व आठ नगर परिषद आहे. नाशिक जिल्हयाचे हवामान सर्वसाधारण विषम स्वरूपाचे असून, वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२९१- ०० मि.मि.आहे. जिल्हयातील जमिन काळी,माळ, कोरड व बरड चार प्रकारात विभागलेली आहे.

जिल्हयातील २००१ च्या एकूण लोकसंख्येपैकी ६१.१६ टक्के व्यक्ति ग्रामिण भागात रहातात. एकूण लोकसंख्येच्या २४.१८ टक्के अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेला हा जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. एकूण लोकसंख्येशी साक्षरतेचे प्रमाण ७४.१५ टक्के आहे. सन २००१ या वर्षात जिल्हयात ८,६४,६६१ हेक्टर जमीन लागवडीखाली आणण्यात आली. ती जिल्हयाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५५.३० प्रतिशत एकूण होती. ८,६४,६६१ हेक्टर पिकाखालील क्षेत्रापैंकी ९३.५१ प्रतिशत जमीन ही निव्वळ पिकाखालील क्षेत्र असून दूबार पिक हे निव्वळ पिकाखालील क्षेत्राच्या ६.४८ प्रतिशत होते. एकंदर पिकाखालील क्षेत्रापैकी ७,४२,९०० हेक्टर जमीन ही खाद्य पिकाखालील होती. ती एकूण पिकाखालील क्षेत्राच्या ८५.९१ प्रतिशत होती. अखादय पिकाखालील १,२१,७६१ हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील क्षेत्राच्या १४.०८ प्रतिशत होते. नाशिक जिल्हयात एकलहरे येथे औष्णिक विद्युत प्रकल्प असून त्यातून उत्पादीत वीज महाराष्ट्रत तसेच इतर राज्यांना पुरविली जाते. सन २००१ च्या जनगणनेप्रमाणे जिल्हयातील एकूण १,९३१ खेडयांपैकी (ओसाड गावे सोडून) सर्व खेडयांचे व जिल्हयातील सर्व १७ नागरी भागाचे विद्यूतीकरण झालेले आहे. जिल्हयातून मुंबई- धुळे आग्रा व पुणे- नाशिक हे दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून, या दोन मार्गामुळे नाशिक शहर निरनिराळया राज्यातील शहरांशी जोडले गेले आहे. जिल्हयात असलेल्या राज्य महामार्गामुळे जिल्हयातील महत्वाची शहरे व तालुक्याची ठिकाणे जोडली गेली आहे.

जिल्हयात २८७ कि.मी. लोहमार्गाचे जाळे असून जिल्यातील इगतपूरी, नाशिक, निफाड, नांदगाव व येवला या तालुक्यातून लोहमार्ग गेलेला आहे. या लोहमार्गावर जिल्हयातील मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. तेथून दक्षिण भारतात जाणारा रेल्वेचा मार्ग गेलेला आहे. जिल्हयात जिल्हा परिषदेद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. जिल्हा परिषदेची १०३ प्राथमिक आरोग्यकेंदा्रे व ५३० उपकेंद्रे, आयुर्वेदिक दवाखाने ११, ग्रामिण रूग्णालय २४, कुटीर रूग्णालय १ कार्यरत आहे.

जिल्हयातील शैक्षणिक सेवा / सुविधा उपलब्ध असून १९९९-२००० अखेर प्राथमिक शाळा ३,३२९ तर माध्यमिक शाळा व उच्चमाध्यमिक ७७६ होत्या. सर्व शाळा व विद्यालयातून १९९९-२००० अखेर १०,६९,८८० विद्यार्थि शिक्षण घेत होते.