सर्व धर्म मंदीर तपोवन
प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पंचवटीतील तपोवन परिसरात सर्व धर्म मंदिर
सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे. प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांनी १४ वर्षांच्या वनवासातील
बराचसा काळ या तपोवनात गोदातीरी व्यतीत केला. त्यांच्या जीवनात घडलेल्या काही प्रसंगांचे
दर्शन राम दरबारच्या माध्यमातून या सर्व धर्म मंदिरात होते. तपोवणात जेथे शूर्पणखेचे नाक
कापले होते तेथून हाकेच्या अंतरावर कपिला गोदावरी संगमासमोर हे सर्व धर्म मंदिर असून
येणाऱ्या प्रत्येकाचे आकर्षणाचे केंद्र ठरते आहे. त्यामुळे येथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढू
लागली आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, पारशी होण्याअगोदर आपण सर्व मानव आहोत.
मानवता हाच आपला वास्तविक धर्म असल्याचा संदेश मंदिरातील सर्व धर्माची चिन्ह देतात.
या मंदिरात शूर्पणखेचे नाक कापणे, सीतेचे अपहरण, प्रभू रामचंद्रांना शबरीनी खाऊ घातलेली बोरे,
प्रभू रामांच्या पादुका घेऊन निघालेला प्रिय बंधू भरत यासारखे प्रसंग उभे केले आहेत.
याशिवाय येथे श्री गणेश, दुर्गा, राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण, विठ्ठल रुक्मिणी, संतश्रेष्ठ माऊली
ज्ञानेश्वर, गुरू नानक देवजी, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, गौतम बुद्ध, महावीर स्वामी,
जगन्नाथ धाम, श्री हंसजी महाराज, माता राज राजेश्वरी देवी यांसह धनुर्धारी श्रीराम आणि
बलशाली रामभक्त हनुमान यांच्या प्रसन्न मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेतात.